शाळेतील आठवणी

अडगळीच्या खोलीमधलं दप्तर आजही जेंव्हा दिसतं

मन पुन्हा तरुण होऊन बाकावरती जाऊन बसतं

प्राथनेचा शब्द अन शब्द माझ्या कानामधे घुमतो

गोल करुन डबा खायला मग आठवणींचा मेळा जमतो

या साग्ळ्यात लाल खुणानी गच्च भरलेली माझी वही

अपुर्ण असल्याचा शेरा आणि बाई तुमची राहून गेलेली सही

रोजच्या अगदी त्याच चुका आणि हातावरले व्रण

वहीत घट्ट मिटुन घेतलेले आयुष्यातले कोवळे क्षण

पण या सगळ्या शिदोरीवरच बाई आता रोज जगतो

चुकलोच कधी तर तुमच्यासरखं स्वतःलाच रागवून बघतो

इवल्याशा या रोपट्याची तुम्ही इतकी वाढ केली आहे

बेरजेत हमखास हातचा चुकण याची सवय आता गेली आहे

चांगलं अक्षर आल्याशिवाय मला माझा हात लिहू देत नाही

एक ओळीत सातवा शब्द आता ठरऊन सुधा येत नाही

दोन बोट संस्काराचा समास तेवढा सोडतो आहे.

फळ्यावरच्या सुविचारासारखी रोज माणसं जोडतो आहे.

योग्य तिथ रेघ मारुन परत एक मर्यादा ठरविलेली

हळव्या क्षणांची काही पानं ठळख अक्षरात गिरविलेली

तारखेसह पूर्ण आहे वही फक्त एकदा पाहून जावा

दहा पैकी दहा गुण आणि सही तेवढी देवून जावा

0 comments:

Post a Comment